PM Surya Ghar Yojana 2024
PM Surya Ghar Yojana 2024 स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घोषित केली आहे. प्रधानमंत्री यांच्या घोषणेनंतर भारत सरकारच्या 2024 – 2025 या आर्थिक वर्षातील बजेटमध्येही या योजनेबद्दल सविस्तर माहिती देण्यात आलीये.
प्रधानमंत्री सूर्य घर योजनेसाठी सरकारने ७७ हजार कोटी रुपयांचं बजेट पास केलं आहे. या योजनेनुसार नागरिकांनी त्यांच्या घरांच्या छतावर सोलर पॅनल लावायचे आहेत. त्यासाठी केंद्र सरकारकडून त्यांना सबसिडीही मिळेल. घरावर सोलर पॅनल लावल्यानंतर जी वीज तयार होईल, त्या विजेमधून 300 युनिट वीज घर मालकाला मिळेल.
या PM Surya Ghar Yojana 2024 योजनेअंतर्गत केंद्र सरकारने 1 कोटी घरांना मोफत वीज देण्याचा संकल्प सोडला आहे. मग ही योजना नेमकी आहे तरी काय ? या योजनेसाठी अर्ज कसा करायचा ? या योजनेसाठी काय अटी आहेत ? त्याचा फायदा काय आहे ? हे सगळं आपण आज जाणून घेऊया.
PM Surya Ghar Yojana 2024 नेमकी काय आहे ?
अजूनही आपल्या भारत देशामध्ये अशी अनेक गावं आहेत, जेथे वीज पोहचली नाहीये. किंवा आर्थिक परिस्थितीमुळे अनेक कुटुंबाचं वीज कनेक्शन कापलं जातं. त्यामुळे त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतं. घरातील लहान मुलांना अभ्यास करता येत नाही.
एखादा घरगुती छोटा व्यवसाय करायचा असेल, तर त्यासाठीही विजेचा खूप जास्त वापर होतो आणि मग भरमसाठ बिल येतं. आपल्या देशात औष्णिक प्रक्रियेद्वारे वीज मोठ्या प्रमाणात बनवली जाते. या प्रक्रियेसाठी कोळसा जाळण्यात येतो आणि मोठ्या प्रमाणात प्रदूषणही होतं.
या सर्व समस्यांवर तोडगा म्हणून केंद्र सरकारने प्रधानमंत्री सूर्य घर योजना राबवण्याचं ठरवलंय. या योजनेत जी वीज तयार केली जाईल, ती स्वच्छ असेल. म्हणजेचं कोणतही प्रदूषण होणार नाही आणि त्यासाठी अपारंपारिक पद्धतीने वीज निर्माण केली जाईल आणि ती पद्धत म्हणजे सौर ऊर्जा.
सौर पॅनल लावून ही सौर ऊर्जा तयार केली जाईल. सरकारने लोकांच्या मदतीसाठी आणि भारतीय लोकांना फायदा व्हावा, अशी या योजनेची निर्मिती केली आहे. योजनेच्या अटींची पूर्तता करून भारताचा रहिवासी असलेला व्यक्ती स्वतःच्या घरावर सोलर पॅनल लावू शकतो.
हे पॅनल लावण्यासाठी जो खर्च येईल, त्यातील काही सबसिडी त्याला केंद्र सरकारतर्फे मिळेल आणि बाकीचं लोनही त्याला सरकारकडून मिळेल. घरावर सोलर पॅनल लावल्यानंतर 300 युनिट पर्यंत मोफत वीज या ग्राहकांना देण्यात येईल.
या योजनेअंतर्गत संपूर्ण देशातील 1 करोड घरांना मोफत वीज देण्याचं उद्दिष्ट केंद्र सरकारने ठेवले आहे. 2024 – 2025 च्या अर्थसंकल्पात 77 हजार कोटी रुपयांचं बजेट या योजनेसाठी पास करण्यात आलंय.
PM Surya Ghar Yojana 2024 निसर्गासाठी किती उपयोगी ?
आपल्या भारत देशात ८० % पेक्षा जास्त वीज कोळसा जाळून म्हणजेचं औष्णिक वीज केंद्राद्वारे बनवली जाते. या पद्धतीने वीज बनवल्याचं मोठ्या प्रमाणात प्रदूषण तर होतंच पण त्याबरोबरचं कोळसा आपल्या पृथ्वीवर पुढील काही वर्षांचा पाहुणा आहे. काही वर्षांनंतर कोळस्याच्या खाणीतून कोळसा मिळणार नाही आणि मग या औष्णिक विद्युत केंद्रातून वीज बनवणं शक्य होणार नाही.
त्यामुळंच आता केंद्र सरकार इतर पर्यायांचा विचार करत आहे. या इतर पर्यांयांमध्ये सौर ऊर्जेद्वारे वीज निर्मिती करणं सर्वात चांगला पर्याय दिसतो. कारण आपल्या देशात स्वच्छ आणि मुबलक सूर्यप्रकाश वर्षाच्या १२ महिने उपलब्ध असतो. या सूर्यप्रकाशाचा वापर करून वीज निर्मिती करणं सहज शक्य आहे.
त्यामुळेच आता भारत सरकारने PM Surya Ghar Yojana 2024 आणली आहे. या योजनेद्वारे केंद्र सरकार लोकांनाच त्यांच्या घरावर सोलर पॅनल इन्स्टॉल करण्याला प्रोत्साहित करतंय. सरकार या योजनेसाठी उत्सुक असलेल्या लोकांना सोलर पॅनल बनवण्यासाठी सबसिडीही देईल. हे सोलर पॅनल बसवल्यानंतर जी वीज तयार होईल त्यामधील ३०० युनिट वीज त्या घरमालकाला मोफत देण्यात येईल. उरलेली वीज सरकार खरेदी करेल. म्हणजेचं PM Surya Ghar Yojana 2024 प्रधानमंत्री सूर्य घर योजनेद्वारे सरकार प्रयेक भारतीय व्यक्तीला मोफत वीज देण्याचा प्रयत्नही करतेय आणि रोजगार मिळवण्याची आणि कमाई करण्याची संधीही देत आहे.
प्रधानमंत्री सूर्य घर योजनेसाठी काय अटी आहेत ?
तुमच्या मनात हा प्रश्न नक्कीचं आला असेल की, मग आता या योजनेसाठी सगळेच भारतीय अर्ज करू शकतात का ? की काही अटी आहेत ? आपण त्याबद्दल जाणून घेऊया. भारत सरकारने प्रधानमंत्री सूर्य घर योजनेसाठी खालील अटींची पूर्तता करणं बंधनकारक केलंय.
- प्रधानमंत्री सूर्य घर योजनेसाठी अर्ज करणारा व्यक्ती नागरिक भारताचा कायमस्वरूपी रहिवासी असावा.
- या योजनेअंतर्गत घराच्या छतावर सोलर पॅनल लावले जाणार आहेत. त्यामुळे पक्के छत असलेल्या घराच्या मालकांनाचं या योजनेसाठी अर्ज करता येईल. म्हणजे ज्या लोकांकडे फ्लॅट आहेत, त्यांना या योजनेसाठी अर्ज करता येणार नाही.
- योजनेसाठी अर्ज केलेल्या घरांमध्ये वैध पद्धतीने जोडलेली वीज असावी.
- अर्जदाराने याआधी कोणत्याही प्रकारची सोलर योजनेची सबसिडी घेतलेली नसावी.
प्रधानमंत्री सूर्य घर योजनेसाठी अर्ज कसा करायचा ?
या योजनेसाठी भारत सरकारने एक संकेतस्थळ म्हणजेचं वेबसाईट लॉन्च केली आहे.
या वेबसाईटवर जाऊन तुम्ही अर्ज सादर करू शकता.
खालीलप्रमाणे स्टेप्स फॉलो करून तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता.
1 . https://pmsuryaghar.gov.in या संकेतस्थळावर गेल्यावर तुम्हाला Apply For PM Surya Ghar Yojana या बटनावर क्लिक करायचे आहे.
2. यानंतर तुमच्यासमोर एक फॉर्म ओपन होईल या फॉर्ममध्ये खालील माहिती भरावी लागेल.
अ. तुमचं राज्य
ब. तुमची वीज वितरण कंपनी
क. तुमचा वीज ग्राहक क्रमांक
ड. तुमचा मोबाईल नंबर
इ. तुमचा ईमेल आयडी
3. एवढी माहिती भरल्यानंतर तुम्ही या वेबसाईटवर रजिस्टर व्हाल, त्यानंतर तुम्हाला सोलर रुफ टॉप योजनेसाठी अर्ज करायचा आहे.
4. हा अर्ज DISCOM कडून तपासला जाईल आणि मग मंजुरी भेटल्यानंतर तुमच्या घराजवळील डिस्कोममध्ये नोंदणी असलेल्या विक्रेत्याकडून तुम्हाला सोलर रूट ऑफ योजनेअंतर्गत स्वतःच्या घरावर सोलर पॅनल इंस्टॉल करायचे आहेत.
5. सोलर पॅनल इंस्टॉल झाल्यानंतर या सोलर पॅनलचे तपशील तुम्हाला सबमिट करायचे आहेत आणि नेटमीटर साठी अर्ज करायचा आहे.
6. नेटमीटर बसवून झाल्यानंतर आणि DISCOM द्वारे तपासणी केल्यानंतर तुम्ही कमिशनिंग प्रमाणपत्र तयार करू शकता.
7. जेव्हा तुम्हाला कमिशनिंग रिपोर्ट मिळेल, त्यानंतर तुम्ही या पोर्टलवर तुमचा बँक खात्याचा तपशील आणि एक रद्द चेक अपलोड करायचा आहे. येत्या 30 दिवसात तुमच्या बँक खात्यात डीबीटीद्वारे सबसिडीची रक्कम जमा केली जाईल.
जेव्हा तुमच्या घराच्या छतावर या योजनेअंतर्गत सोलर पॅनल बसवले जातील आणि वीजनिर्मिती सुरु होईल, तेव्हा निर्माण झालेल्या वीजेपैकी ३०० युनिट वीज तुम्ही तुमच्या घरात मोफत वापरू शकतात आणि उरलेली वीज सरकार घेईल.
प्रधानमंत्री सूर्य घर योजनेअंतर्गत किती रुपयांची सबसिडी मिळेल ?
या योजनेअंतर्गत केंद्र सरकार संपूर्ण खर्चाच्या 60 % सबसिडी देणार आहे. या योजनेच्या संकेतस्थळावर याबद्दलचं एक कॅल्क्युलेटरही उपलब्ध करून देण्यात आलंय. तेथे जाऊन तुमच्या घरात किती वीज लागते, या अंदाजावर किती किलो वॅटचं सोलर पॅनल लावावं लागेल, ही माहिती मिळते.
उदहरणार्थ : जर तुम्हाला तुमच्या घराच्या छतावर 2 किलो वॅटचं सोलर पॅनल इंस्टॉल करायचं असेल, तर 60% सबसिडी मिळेल. यापुढे जर तुम्हाला 3 किलो वॅटचं सोलर पॅनल इंस्टॉल करायचं असेल, तर 1 किलो वॅट किमतीच्या 40% सबसिडी मिळेल.
म्हणजेच 1 किलो वॅटच्या सिस्टीमसाठी 30000 रुपये, 2 किलोवॅटच्या सिस्टीमसाठी 60 हजार रुपये आणि 3 किलो वॅटच्या सिस्टीमसाठी 78 हजार रुपये सबसिडी मिळेल.
सध्या 1 किलो वॅटच्या सोलर पॅनलसाठी 1 लाख 45 हजार रुपयांचा खर्च येतो. सुरुवातील हा खर्च खूप जास्त वाटू शकतो. परंतु पुढील भविष्यात मोफत मिळणारी वीज झालेल्या खर्चापेक्षा नक्कीचं जास्त फायदेशीर असेल.
त्यामुळेच जेव्हापासून या योजनेची सुरुवात झाली आहे, तेव्हापासून लोकांचा या योजनेला चांगला प्रतिसाद मिळतोय. अनेक लोक स्वतःच्या घरावर सोलर पॅनल लावण्यासाठी खूप उत्सुक आहेत.
प्रधानमंत्री सूर्य घर योजनेचे फायदे काय आहेत ?
- भारतातील 1 कोटी घरांना मोफत वीज देण्याचे लक्ष सरकारने ठेवले आहे.
- सौर ऊर्जेद्वारे ही वीज निर्मिती केली जाणार असल्याने प्रदूषणाला आळा घालण्यास मदत होईल.
- सध्या देशात अनेक ठिकाणी विजेची कमतरता आहे, ती पूर्ण करण्यास मदत होईल.
- गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांचे उत्पन्न वाढवणे, वीज बिलावरीली खर्च कमी करणे, हे सरकारचे उद्दिष्ट आहे.
- या योजनेमुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल, अशी सरकारला अपेक्षा आहे.
FAQ’s About PM Surya Ghar Yojana प्रधानमंत्री सूर्य घर योजनेबाबत वारंवार विचारले जाणारे प्रश्न
आता तुमच्या मनात या योजनेबद्दल अनेक प्रश्नही असतील, आपण त्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊयात.
1. प्रश्न : PM Surya Ghar Yojana 2024 नेमकी आहे तरी काय ?
उत्तर : भारतातील 1 कोटी घरांना मोफत वीज देण्यासाठी आणि रोजगार निर्मिती करण्यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे.
2. प्रश्न : प्रधानमंत्री सूर्य घर योजनेअंतर्गत वीज निर्मिती कशी केली जाईल ?
उत्तर : या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांच्या घराच्या छतावर सौर पॅनल इंस्टॉल केले जातील आणि सूर्य प्रकाशाच्या मदतीने वीज निर्मिती केली जाईल. ज्यामुळे कोणतही प्रदूषण होणार नाही.
3. प्रश्न : प्रधानमंत्री सूर्य घर योजनेसाठी अर्ज कसा करायचा ?
उत्तर : या योजनेसाठी https://pmsuryaghar.gov.in या वेबसाईटवर जाऊन तुम्ही अर्ज सादर करू शकता.
4. प्रश्न : PM Surya Ghar Yojana 2024 अंतर्गत किती सबसिडी मिळेल ?
उत्तर : या योजनेअंतर्गत एकूण खर्चाच्या 60% सबसिडी मिळणार आहे. तसेच बाकीच्या खर्चासाठी कमी दरात सरकार बँकेचं कर्जही उपलब्ध करून देईल.
एकूणचं प्रधानमंत्री सूर्य घर योजना नक्कीचं गेम चेंजर ठरू शकते. गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना या योजनेचा मोठा फायदा होऊ शकतो. उद्योग धंद्यांना चालना मिळू शकते आणि आपल्या देशात जे ऊर्जा संकट आहे ते दूर होऊ शकतं.
तुम्हाला या PM Surya Ghar Yojana 2024 योजनेबद्दल आणखीन काही प्रश्न असतील, तर नक्कीचं कमेंट करा आणि त्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करू. केंद्र आणि राज्य सरकारच्या इतर योजनाबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी आमचे इतर लेखही नक्कीचं वाचा.
धन्यवाद !