जया आज खूप दुःखी होती. ती रडत होती, कारण तिचं एक मोठं स्वप्न कधीही पूर्ण होऊ शकणार नव्हतं. जया ही गरीब घरची मुलगी. तिला शिक्षणाची खूप आवड होती. परंतु घरची परिस्थिती बेताची असल्याने तिला दहावीनंतर शाळा सोडावी लागली. दहावीची परीक्षा ती खूप चांगल्या मार्काने पास झाली होती.
त्यानंतर आई-बाबांनी तिच्या लग्नाची तयारी सुरू केली. तिच्यासाठी मुलं पाहिली आणि अठरा वर्षांची पूर्ण होताचं तिचं लग्नही उरकून टाकलं. सासरी आल्यावर संसाराच्या जबाबदाऱ्यात ती पूर्णपणे अडकली होती. जयाचा नवरा आनंद खूप समजदार होता. तो स्वतः जास्त शिकलेला नव्हता. तरीसुद्धा शिक्षणाचं महत्त्व त्याला माहीत होतं. म्हणून जेव्हा जयाने त्याने सांगितलं की, मला शिकायचंय, तेव्हा तो तयार झाला.
Marathi Motivational Story
जयाने अकरावी बारावीसाठी बाहेरून ऍडमिशन घेतलं आणि ती घरी अभ्यास करायची. तिने अकरावी चांगल्या मार्काने पास केली. परंतु सासू-सासर्यांच्या दबावाला ती बळी पडली आणि बारावीला असतानाचं गरोदर राहिली. बारावीच्या परीक्षेला अवघे दोन महिने बाकी असताना तिची डिलिव्हरी झाली आणि तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला.
आजचं बारावीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर झालं होतं आणि परीक्षा येत्या काही दिवसात सुरू होणार होती. परंतु जयाचं बाळ अवघ्या एका महिन्याचं होतं. एक महिन्याच्या बाळाला घरी सोडून पेपर कसा द्यायचा हाचं प्रश्न तिच्यासमोर होता. सासूबाईंनी तर स्पष्टपणे नकार दिला होता आणि त्या म्हणाल्या, “काही परीक्षा देण्याची गरज नाही. तुझं लग्न झालंय, आता बाळ झालंय, त्याकडे लक्ष दे. हे अभ्यासाचं आणि शिक्षणाचं खूळ डोक्यातून काढून टाक.”
हे ऐकून जया खूप निराश झाली होती. तिला खूप शिकायचं होतं, ग्रॅज्युएशन पूर्ण करायचं होतं. परंतु जर आपण यावर्षी बारावीची परीक्षा नाही देऊ शकलो, तर सासूबाई आपल्याला परत कधीचं शिकू देणार नाहीत, आपलं शिक्षण कायमचं मागे पडेल, याची जाणीव तिला होती. त्यामुळे ती खूप दुःखी होती आणि रडत होती.
तेवढ्यात जयाचा नवरा आनंद घरी येतो आणि जयाला रडताना पाहून विचारतो, “काय झालं, का रडतेस तू ? काही दुखतंय का ?” जया सांगते, “नाही बरी आहे मी. परंतु यावर्षी मला बारावीच्या बोर्डाची परीक्षा देता येणार नाही ना, म्हणून रडतेय.” आनंद विचारतो, “का काय झालं, का नाही देऊ शकणार तू परीक्षा ? तू तर किती अभ्यास केला आहे. बायका गरोदर असताना पोथी, पुराण वाचतात, गर्भसंस्काराची पुस्तकं वाचतात. परंतु तू तुझ्या बारावीच्या पुस्तकांचा अभ्यास केला आहे. मला शंभर टक्के गॅरंटी आहे, तू चांगल्या मार्काने पास होशील. मग का नाही द्यायची परीक्षा ?”
जया सांगते, “सासुबाईंनी नकार दिलाय. त्या म्हणाल्यात की, एक महिन्याच्या मुलीला सोडून कुठे पेपर द्यायला जाशील. काही परीक्षा द्यायची गरज नाही. पुढच्या वर्षी दे. तसं त्यांचही बरोबर आहे, मी दोन-तीन तास परीक्षेला जाणार, तेव्हा छकुलीला कोण सांभाळेल ? खूप लहान आहे ती. दूध पिते. एवढा वेळ तिला असं ठेवणं, खूप चुकीचं आहे.”
आनंद तिच्याजवळ बसतो आणि तिचा हात हातात घेऊन म्हणतो, “एवढीचं गोष्ट आहे ना. मग ज्या दिवशी तुझा पेपर असेल, त्या दिवशी मी सुट्टी घेईल आणि तुझ्या क्लासरूम बाहेर बसेल. छकुलीला नेहमी तुझ्या नजरेसमोर ठेवेल. तीची संपूर्ण काळजी घेईल. काळजी नको करूस तू.” जया म्हणते, “माझ्यासमोर हे बोलायला सोपंय. पण सासूबाई समोर बोलता येईल का तुम्हाला ?” आनंद म्हणतो, “तसं तर मी आईच्या विरोधात जात नाही. परंतु तुझ्या शिक्षणासाठी मी आईच्या काय, अख्ख्या जगाच्या विरोधात जाईल, तू नको काळजी करूस.”
जयाच्या सासूबाई बाहेर उभ राहून सगळं ऐकत असतात आणि त्या चिडून आतमध्ये येऊन म्हणतात, “वा रे वा सुनबाई, भरले का माझ्या मुलाचे कान माझ्याविरुद्ध आणि मी काय चुकीचं बोलले गं, एक महिन्याच्या मुलीला सोडून कुणी परीक्षा द्यायला जातं का ? एवढं शिकून काय करायचंय तुला ? कोणते दिवे लावणार आहेस ?” आनंद म्हणतो, “आई तिला काही बोलू नकोस आणि तिने माझे काही कान भरले नाहीत. तिला शिकायचंय तर शिकू दे. बाळाची काळजी मी घेईल, तू नको काळजी करूस.”
जयाच्या सासूबाईंना खूप राग येतो आणि त्या म्हणतात, “बायकोचा बैल झालायस तू. काय करायचं ते कर, परंतु उद्या बाळाला काही झालं, तर माझ्याकडे नको येऊ.” असं म्हणून त्या रागारागाने तेथून निघून जातात. जया खूप दुःखी होते. आनंद तिला समजावून सांगतो, “तू नको विचार करू तिच्या बोलण्याचा. ती नेहमी असंच बोलत राहते. पण तिच्या मनात काही नसतं. उद्या तू पास झाली ना, तर सर्वात जास्त आनंद तिलाचं होईल.”
जया आनंदला म्हणते, “ते सगळं ठीक आहे, परंतु जेव्हा मी परीक्षेला क्लासरूममध्ये बसेल, तेव्हा मला क्लासरूमच्या बाहेर नाही येता येणार आणि जर छकुली रडायला लागली, तर तुम्ही काय कराल ? ती खूप रडते.” आनंद म्हणतो, “आपली मुलगी तुझ्यासारखी समजूतदार आहे. तिलाही समजेल, आपल्या आईचं स्वप्न पूर्ण होतंय आणि त्यासाठी तीही हातभार लावेल. ती नाही रडणार, तू काळजी करू नकोस.” जया कशीबशी हो म्हणते. परंतु तिच्या मनात शंका असते, हे सगळं कसं जमणार.
काही दिवसानंतर बारावीच्या परीक्षांना सुरुवात होते. जयाचा बोर्डाचा पहिला पेपर असतो. त्या दिवशी आनंदने वचन दिल्याप्रमाणे सुट्टी घेतलेली असते. जया घरी देवाचा आणि सासू-सासऱ्यांचा आशीर्वाद घेऊन घराबाहेर पडते. पण तिची सासू तोंड वाकडं करते. जया परीक्षेच्या केंद्रावर येते. तोपर्यंत तर छकुली शांत असते. परंतु तेथे आल्यावर ती रडू लागते. जया म्हणते, “अहो, पाहिलं का रडायला लागली ती. आता काय करायचं ? परीक्षेला फक्त दहा मिनिट बाकी आहेत.” आनंद म्हणतो, “घाबरु नको, तिला दूध पाज आणि दे माझ्याकडे.”
जया बाळाला दूध पाजते, बाळ झोपी जातं. एवढ्यात परीक्षा सुरू होणार असल्याची घंटा वाजते. जया लगेच छकुलीला आनंदकडे येते आणि म्हणते, “आता परीक्षा सुरू होईल. तुम्ही तिला नीट सांभाळा. जास्त रडू देऊ नका.” आनंद म्हणतो, “नको काळजी करू. मी सगळं सांभाळून घेईन. तू तुझ्या परीक्षेची काळजी कर.” जया गडबडीत क्लासरूममध्ये जाते. परीक्षेला सुरुवात होते. परंतु तिचं लक्ष बाहेर बाळ रडतंय की काय, याकडेचं असतं. परंतु आनंद छकुलीला खूप छान सांभाळतो. दूध पिऊन छकुली तासभर शांत झोपते.
परंतु अचानक तिची झोपमोड होते आणि ती रडू लागते. संपूर्ण शाळेत खूप शांतता असल्यामुळे, तिच्या रडण्याचा आवाज लगेचचं क्लासरूममध्ये परीक्षा देत असलेल्या जयालाही ऐकू येतो आणि तिला समजतं की, छकुली झोपेतून उठली आहे आणि रडतेय.
आनंदला तिला शांत करण्याचा प्रयत्न करतो, पण ती रडतच असते. आनंदला कळतं की, जर छकुली अशीचं रडत राहिली, तर जयाचं पेपर देण्याकडे लक्ष नाही राहणार आणि हे तिच्यासाठी चांगलं नाहीये. तो छकुलीला क्लासरूमपासून थोडा दूर घेऊन जातो आणि अंगाई गाऊन तिला झोपवण्याचा प्रयत्न करतो. परंतु छकुली काही झोपत नाही आणि रडतचं असते. आता काय करावं, हे आनंदला समजतचं नाही. इकडे आनंद छकुलीला घेऊन कुठे गेला, ती खूप रडतेय का, असे प्रश्न जयाला पडल्याने तिचं पेपरमध्ये लक्ष लागत नसतं. ती पेपरमध्ये काहीही लिहत नव्हती.
इकडे आनंदलाही काही सुचत नसतं, तेवढ्यात त्याच्या पाठीवर कुणीतरी थपथप करतं. तो मागे वळून पाहतो तर दुसरं तिसरं कुणी नसून, आनंदची आई म्हणजेचं जयाची सासुबाई उभी असते. ती म्हणते, “मला माहित होतं, माझ्याशिवाय तुमचं पानही हालायचं नाही.” असं म्हणून सासूबाई छकुलीला जवळ घेतात. सासूबाईंनी एक साडी आणलेली असते. त्या आनंदच्या मदतीने क्लासरूम समोरच्याचं झाडाच्या फांदीला ही साडी झोळीसारखी बांधतात आणि छकुलीला या झोळीमध्ये झोपवून मस्त झोका देऊ लागतात.
क्लासरूममध्ये बसलेली जया हे सगळं पाहते आणि सासुबाई आपल्यासाठी येथे आल्या आहेत, त्या छकुलीला सांभाळताय, हे पाहून जयाला खूप आनंद होतो. सासुबाई तिला अंगठा दाखवून ऑल द बेस्ट म्हणतात. जया आणखीनचं खुश होते आणि आपला पेपर लिहू लागते.
छकुलीलासुद्धा समजतं की, आईला खूप महत्त्वाचं काम आहे, ती तिचं स्वप्न पूर्ण करतेय आणि त्यानंतर ती एकदाही रडत नाही. जया पेपर खूप छान लिहिते. पेपर संपल्याची घंटा वाजते. ती पेपर सबमिट करून बाहेर येते आणि सर्वात आधी सासूबाईंना घट्ट मिठी मारते. जयाच्या डोळ्यात पाणी असतं, तसंच ते सासूबाईंच्याही डोळ्यांत असतं.
सासुबाई म्हणतात, “मला माफ कर. मी तुला आधी विरोध केला. परंतु तू पेपरला गेल्यानंतर मला आठवलं की’ माझं सुद्धा लहानपणी असंचं खुल शिकण्याचं स्वप्न होतं, पण ते नाही पूर्ण होऊ शकलं. आता मी तुझं स्वप्न पूर्ण करणार.
तुला किती शिकायचं, तेवढे शिक. ही आई आहे तुझ्या पाठीमागे, तुझ्या मुलीला सांभाळायला, माझ्या नातीला सांभाळायला. हे ऐकून जया आणि आनंदच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असतो. छकुली झोपेतून उठते. जया तिला छातीशी कवटाळते. जया सर्वांना सांगते, मला पेपर खूपचं छान गेला आणि आता पुढचे पेपरही मी असा चांगला अभ्यास करून देणार आज परीक्षा पास होऊन दाखवणार. सगळे आनंदाने घरी जातात.
तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला आजची कथा. नक्कीचं कमेंट करून सांगा आणि अशाचं नवीन नवीन कथांसाठी आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद !